हमारी नाव वहा डुबी...


हमारी नाव वहा डुबी

हमें तो अपनों ने लूटा गैरों में कहां दम था
मेरी किश्ती थी डूबी वहां जहां पानी कम था

पण जितके संवेदनाशील असतो, तितका आपल्याला लौकर रागही येतो. पण त्यातला दोष असा आहे, की आपला राग तितक्याच लौकर शांतही होतो. कालपरवा आपण कशामुळे संतप्त वा प्रक्षुब्ध झालो होतो? त्याचे चार दिवसानंतर आपल्याला पुर्णविस्मरण झालेले असते आणि तीच खरे तर आपल्यासारख्या संवेदनशील समाजाच्या शत्रूंची मोठी ताकद असते. ते आपल्या विस्मरणशक्तीच्या बळावरच त्यांचे डावपेच खेळत असतात आणि सातत्याने आपल्याला आपल्याच क्षेत्रात पराभूत करीत असतात. कालपरवा पुलवामा येथे ४० हून अधिक भारतीय जवानांची भर ताफ़्यावर चढाई करून हत्या झाली, तेव्हा अवघा देश प्रक्षुब्ध होऊन उठला होता. पण ती तशी पहिली घटना अजिबात नव्हती. दहा वर्षापुर्वी अशीच घटना मुंबईच्या भर रस्त्यात घडलेली होती आणि सैनिकांचा नव्हेतर पावणेदोनशे सामान्य नागरिकांचा हकनाक बळी गेलेला होता. दोनतीन वर्षापुर्वी असाच हल्ला पठाणकोट व उरी येथील लष्करी तळावरही झालेला होता आणि आपण इतके़च संतप्त होऊन रस्त्यावर आपला संताप व्यक्त करण्यासाठी उतरलो होतो. पण त्यामागची कारणमिमांसा वा त्यातली रोगबाधा शोधून त्यावर कायमचा उपाय योजण्यासाठी आपल्याकडून कितीसे प्रयत्न झाले? ज्या जवानांच्या हौतात्म्यामुळे आपल्या मनाचा प्रक्षोभ झाला, त्यापैकीच काहीजणांना अधूनमधून काश्मिरात सुरक्षा कारवाई करताना मागून दगडफ़ेकीचे हल्ले सोसावे लागतात. तेव्हा आपण इतकेच रागावतो काय? नसेल तर एखाद्या मोठ्या घटनेनंतर असा प्रक्षोभ किती कामाचा आहे? कारण तशा किरकोळ वाटणार्‍या व भासणार्‍या घटनांमधून मोठ्या हल्ल्यासाठी पोषक वातावरणाची निर्मिती होत असते. सज्जता केली जात असते. त्या किरकोळ वाटणार्‍या प्रसंगातून आपल्या संवेदना शिथील वा गाफ़ील केल्या जात असतात. परिणामी मोठ्या घटनेसाठी पुरेसे निर्धास्त वातावरण घातपात्यांसाठी तयार व्हायला हातभार लागत असतो. कारण अशा घटना रोखण्याचेच काम प्राण पणाला लावून लढणार्‍यांकडे आपण पाठ फ़िरवलेली असते. आपल्याला पुलवामानंतर कर्नल श्रीकांत पुरोहित आठवला काय? आपल्याला टीएसडी हे शब्द वा अक्षरे आठवली काय? सगळे रहस्य तिथेच तर दडलेले आहे ना?

श्रीकांत पुरोहित नऊ वर्षे तुरूंगात सडत पडलेला होता आणि त्याच्यावर हिंदू दहशतवादाचा चेहरा म्हणून सगळीकडून शिक्कामोर्तब केले गेले होते. कुठलाही सज्जड वा कोर्टात टिकणारा पुरावा विरोधात नसताना, पुरोहित व साध्वी प्रज्ञासिंग यांना दिर्घकाळ जामिन कुठल्या कारणास्तव नाकारला जात होता? आपण त्यासाठी कुणाला जाब विचारायला पुढे सरसावलेले होतो काय? त्या नुसत्या आरोप व जामिनाचे निमीत्त करून सतत हिंदू दहशतवादाचे आरोप करणार्‍यांना जाब विचारण्यासाठी आपल्यातले कितीजण पुढे आलेले होते? नऊ वर्षानंतर श्रीकांत पुरोहितला जामिन मिळाला आणि मध्यंतरीच्या काळात त्याचा पोलिसांकडून अनन्वीत छळ झाला. तेव्हा आपण मस्त झोपा काढत नव्हतो काय? श्रीकांत पुरोहित हा लष्करी गुप्तचर सेवेतला मोक्याचा अधिकारी होता आणि समाजात मिसळून तिथे गुपचुप चाललेल्या काही हालचालींची माहिती मिळवत होता. त्याच माहितीच्या आधारे भविष्यात होऊ शकणार्‍या डझनावारी घातपातांना रोखणे शक्य झालेले होते. कुठल्या वर्तमानपत्राने किंवा माध्यमाने कधी पुरोहित लष्करी सेवेत कुठले काम करीत होता, त्याची कधीच माहिती दिली नाही किंवा लपवली. आपण सामान्य वाचक वा नागरिक म्हणून अशा माध्यमे किंवा पत्रकारांचा कान पकडून सत्य माहिती मिळवण्याचा आग्रह धरला होता काय? मुंबईत कसाब टोळीचा हल्ला होऊन दिडदोनशे लोकांचा बळी पडल्यावर आपण खडबडून जागे झालो आणि शहीदांसाठी मेणबत्या लावायला पुढे सरसावलो. तेव्हाही कर्नल पुरोहित कार्यरत असता किंवा गजाआड खितपत पडलेला नसता, तर मुंबई हल्ला होऊ शकला असता काय? आपल्या मनाला हा प्रश्नही शिवला नाही. ज्यांनी पुरोहितला गजाआड टाकले त्यांनीच वास्तवात कसाब टोळीचा समुद्रमार्गे मुंबईत आरामात पोहोचण्याचा मार्ग खुला करून ठेवलेला होता. नेमके तसेच काही आता लष्करी ताफ़्यात स्फ़ोटकांनी भरलेले वाहन घुसवण्यासाठी निघालेल्या आदिल दार याला कोणीतरी मदत केलेली आहे. ती मदत पाकिस्तानी गुप्तहेरसंस्था देत नसते, तर पुलवामातील काही गद्दार तशी मदत दारला देत असतात आणि भारत्तीय लष्कराच्या ४० सैनिकांना ठार मारण्यासाठी पाकिस्तानला मदत करत असतात. आपल्या मनाला हा विषय कधी शिवला आहे काय? तो किंवा तसे हल्ले पुरोहित किंवा टीएसडी अशा सेवांमुळे शक्य होत नव्हते. पुरोहित वा टीएसडी नेमके काय काम करतात?

टीएसडी म्हणजे भारतीय सेनादलाच्या कुठल्याही कागदपत्रात नोंद नसलेली एक लष्करी तुकडी होती. तिला गुप्तचरही म्हणता येणार नाही. गुप्तचर विभागाच्या कामकाजाची निदान कुठेतरी कागदोपत्री नोंद केलेले असते. पण टीएसडी वा टेक्नीकल सपोर्ट डिव्हीजन ही तुकडी वा तिचे कामकाज कुठल्याही कागदोपत्री नोंदी्त सापडणार नाही. कारण दफ़्तरी नोंदीत अशी कुठली तुकडी नसते आणि अस्तित्वात असल्याचे भारत सरकार वा संरक्षण खातेही मान्य करणार नाही. आपण ज्याला लष्करे तोयबा वा जैश महंमद वगैरे म्हणतो, तसेच काहीस टीएसडीचे स्वरूप असते. त्या तुकडीचे काम बेकायदा व नियमबाह्य असल्याने कुठल्याही सरकारी दफ़्तरात त्यांची नोंद होणार नसते. किंवा केलेल्या कारवाईचे कसलेही श्रेय घ्यायला हे लोक पुढे येणार नाहीत. कारण ते असल्याची नोंद कुठेच नसते, तर त्यांचा पराक्रम वा कार्य याविषयी जाहिर चर्चा होणारच कशी? पण अशा तुकड्या सावलीत राहुन काम करतात आणि त्यांच्यावर कधी प्रकशझोत टाकला जात नसल्याने, त्यांची सावलीही कोणाला कुठे आढळत नाही. हे लोक देशासाठी आपले भवितव्य आणि प्राणही पणाला लावत असतात. दिर्घकाळ पाकिस्तानी माध्यमात भारताविरोधी दिलेल्या बातम्यात या टिएसडीचा उल्लेख आपल्याला बघायला मिळू शकतो. पण तसा उल्लेख एका भारतीय माध्यमात आला आणि खुद्द भारत सरकारलाच त्यांच्या विरोधात कारवाई करायची वेळ आणली गेली. म्हणजेच भारताविरुद्ध चाललेल्या घातपाती पाकिस्तानी युद्धाच्या विरोधात चाललेल्या तशाच प्रतिकाराला कमकुवत व नेस्तनाबुत करण्याचे काम इथे बसलेल्या काही पत्रकार, राजकारणी व अधिकार्‍यांनी पार पाडलेले आहे. मात्र आपल्याला त्या अधिकारी वा लष्करी तुकडीचे नामोनिशाणही ठाऊक नसते. त्यांच्यविषयी आस्था कौतुकही नसते. तुमच्यामाझ्यासाठी जे आपला जीव ओवाळून टाकतात, त्यांच्याविषयी आपल्याला किंचीत आपुलकी वा त्यांची ओळखही नसावी, ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे ना? पण ती वस्तुस्थिती आहे आणि स्वत:च्या कौतुकासाठी हे खरेखुरे देशभक्त कधी लाचार ओशाळवाणेही नसतात. उलट आपण सामान्य लोक इतके बेछूट वा बेजबाबदार असतो, की आपल्याच नाकर्तेपणाने वा बेफ़िकीरीने त्यांच्या जीवाला धोका निर्माण करतो आणि पाकिस्तानचे काम सोपे करीत असतो.

कर्नल पुरोहित यांच्यावर मालेगाव स्फ़ोटातला संशयीत म्हणून सप्टेंबर २००८ मध्ये आरोप ठेवला गेला आणि त्यानंतर अवघ्या दोन महिन्यात कसाब टोळी मुंबईत राजरोस येऊ शकली. कुलाब्यासारख्या वर्दळीच्या जागी कोळीवाड्याच्या वस्तीतून हे दहा मारेकरी आरामात हमरस्त्यापर्यंत चालत आले. त्यांच्याकडे असलेली हत्यारे वा स्फ़ोटके कोणाच्या नजरेत आली नाहीत? त्या वर्दळीच्या संध्याकाळी त्यांना तिथून सहजगत्या टॅक्सी मिळू शकली? इतकी मुंबई सोपी आहे? कुणीतरी आधीपासून त्यांचे स्वागत करायला व लागेल ती मदत करायला तिथे सज्ज असल्यानेच पहिल्या मुंबई भेटीत या दहा घातपात्यांना इप्सित स्थळी पोहोचता आले. पण अजूनपर्यंत अशा सहाय्य देणार्‍यांचा शोध लागला आहे काय? पुलवामा येथेही स्थानिक मदतीशिवाय इतकी मोठी हायवेवर घटना घडवणे शक्य नव्हते. कुलाब्याची स्थितीही वेगळी नाही. मुद्दा असा, की त्या सहाय्य देणार्‍या स्थानिकांचा वास काढून त्यांना आधीच नामोहरम करावे लागते आणि पर्यायाने असे घातपाती मोठी घटना घडवू शकणे रोखले जाणार असते. पुरोहित व त्यांच्या अन्य सहकार्‍यांनी अशा शंकास्पद गट व लोकांमध्ये घुसून काढलेली गुप्त माहितीच तशा घटना मोठ्या प्रमाणात रोखू शकलेली होती. तर त्यांच्याच मुसक्या बांधणार्‍या तथाकथित मालेगाव स्फ़ोट तपासाने कुणाला मदत केली? त्या धरपकडीने कुलाब्यात कसाबला मदत करणार्‍यांना मोकळीक दिली आणि त्यापेक्षा वेगळे काहीही पुलवामा येथे घडलेले नाही. उरी वा पठाणकोटलाही वेगळे काहीही घडलेले नव्हते. कसाब वा पुलवामा येथील हल्लेखोरांची स्फ़ोटके तेव्हा़च भेदक होतात, जेव्हा ती योग्य जागी वा घटनास्थळी पोहोचू शकतात. पुरोहित वा टीएसडी अशा लोकांकडून तोच मार्ग रोखला जात असतो व होता. तर त्यांच्याच मुसक्या ज्यांनी बांधल्या, ते प्रत्यक्षात तोयबा वा जैशचे इथले एजंट वा हस्तक असू शकतात. कारण त्यांच्याशिवाय अशा हल्ले व घातपाताचा मार्ग प्रशस्त होऊ शकत नाही. करकरे यांच्या तपास पथकाने वा त्यांच्या राजकीय म्होरक्यांनी कसाबसाठी ते काम पार पाडले होते. पुलवामा उरीसाठी तेच काम, टीएसडीला निकामी करणार्‍या माध्यमे व पत्रकारांनी पाकिस्तानसाठी पार पाडलेले आहे. म्हणूनच नुसते रागावून चालणार नाही की पाकिस्तानला धडा शिकवण्याच्या डरकाळ्या फ़ोडूनही भागणार नाही. आपल्याला वास्तविक शत्रू ओळखता आला पाहिजे. तो शत्रू पाकिस्तान नाही, किंवा कसाबसारखे घातपातीही आपले खरे शत्रू नाहीत. आपले शत्रू आजही आपल्यात उजळमाथ्याने वावरत असतात आणि युक्तीवादाच्या आडोशाने त्या हल्ल्याला समर्थनही देत असतात. त्याकडे आपण डोळसपणे बघणार आहोत काय? (अपुर्ण

Comments