अडगळीत गेलेले शब्द
अडगळीत गेलेले शब्द ‘अडगळीत गेलेले शब्द’ हे शीर्षक लिहिताच लक्षात आले की ‘अडगळ’ हा शब्दच अडगळीत गेला आहे.पूर्वी प्रत्येक घरात एक अडगळीची खोली असायची.सगळ्या नको असलेल्या,परंतु कधीतरी कामास येणार्या वस्तू तेथे जाऊन पडायच्या.पण 1 BHK अथवा 2 BHK¨च्या जमान्यात अडगळ सरळ भंगारवाल्याकडे जाते. वास्तुशास्त्राच्या दृष्टीने तेच योग्य आहे असे म्हणतात. काय योग्य,काय अयोग्य, हा प्रश्न वेगळाच; पण काळानुसार खूपच शब्द अडगळीत गेले आहेत हे खरे. जुनी घरे आठवताच तसे शब्द खूपच आठवायला लागतात. ओटी, पडवी, परसू, माजघर, कोठीघर हे शब्द विसरायला झाले आहेत.‘वळचण’ हा असाच एक अडगळीत गेलेला शब्द. वळचण म्हणजे छपराचा भिंतीच्याही पुढे आलेला भाग. ऊन-पावसापासून घराचे संरक्षण होण्यासाठी तो तसा ठेवलेला असायचा. घराची वळचण ही गुरा-ढोरापासून आगंतुकापर्यंत सगळ्यांचं विसाव्याचं ठिकाण होतं. कोणीही तेथे विश्रांती घ्यावी असं. ‘फडताळ’ ..... फडताळ म्हणजे भिंतीतील कपाट. खुंटी, कोनाडे, देवड्या हे असेच अडगळीत गेलेले शब्द.घरात माळा असायचा. त्याला ‘आटळा’ म्हणायचे.जुन्या घरातील न्हाणीघर (बाथरूम) असंच. ऐसपैस चुलाण्यावर पंचव...