कोकणातली सोन्याची घरे
कोकणातली सोन्याची घरे !
पूर्वी गुजरातपासून दक्षिणेकडे सागरकीनार्याने केरळ-कन्याकुमारीपासून पुढे बंगालपर्यंत पावसाळ्यात गेलो , की हिरव्या झाडीत - विशेषतः नारलीबनात - छोटीछोटी घरे लपलेली दिसत. ती बहुधा काळपट असत. मात्र पावसाळ्यापूर्वी हिच्बाहुतेक घरे सोन्यासारखी दिसत. कारण ती असत भाताचा पेंढा ,सुके गवत यांनी शाकारलेली घरे थोडीशी काळपट दिसत. या घरात कोकणातली घरे जणू हिरव्या द्वारकेतली सोन्याची घरे शोभून दिसत.
वैशाख मध्यावर आला, कुलाब्याची दांडी बोलू लागली पावसाला जवळ आल्याची चिंन्हे पूर्वी कोकणात दिसू लागायची .
अशात मग हिरव्या झाडीत लपलेली काळ्या केम्ब्लीची घरे उस्तारायला सुरवात व्हायची. घराच्या छ्पारावरचे वर्षभराचे अस्तर म्हणजे काळा पडलेला भाताचा पेंढा. त्याला केम्बली म्हणतात. ती केम्बली काढणे व्हायचे. मग घरातील पुरुष किव्वा घरातील शाळकरी पोरे सकाळी सकाळी घराच्या पास्ठ्यावर चढून थेथून छ्पारावरचे काळे पडलेले घुगे ( जुना पेंढा ) खाली ढकलून द्यायचे. हे घर उस्तारताना घरात कोंडलेली वर्षभराची घाण , स्वयंपाकघरातील काळा dhosa यांनी उस्तारणारी माणसे अंगाने नुसती काळी होत. जणू काळी माकडे ! मग हे काळे पण -धोसाभारले अंग धुवायला नदीवर गेल्याशिवाय पर्याय नसे. हि असायची वर्षाची ढोसामुक्त आंघोळ.
उस्तरलेले घर म्हणजे उभे वासे , आणि आडव्या पेठ्या यांचा नुसता काळा सांगाडा असायचा. असे उस्तरले घर दोन दिवस उन खात तसेच ठेवले जाई. त्या दोन दिवसात घराच्या मोडक्या छपरांची डागडुजी होई. या पेठ्या वैगरे बांधण्यासाठी बाजारू दोऱ्या नसतच , तर घायपात किंवा भोकर धामण या झाडांच्या सालींच्या दोऱ्या असत किंवा वडाच्या पारंब्या असत. कोकणातील पूर्वीची शेणामातीची अशी कुणब्यांची घरे हि आगारात फुकटात मिळणाऱ्या वस्तूंची असत. त्या दृष्टीने त्यांना वेगळे महत्व आहे.
उसवले घर शिवण्यासाठी घर शिवणारा असा खास 'घरशिव्या' असे. त्याच्या सवडीनुसार मग घर शिवले जाई.पावसाळ्याच्या सुरवाती पूर्वी अशा घरशिव्या वर भारी चेप पडलेला असे. गावात तो एखाद-दुसराच असे. तो घर शिवायला मिळता मिळत नसे. पेंढयांच्या गुंड्यांनी घर शिवणे-घर शाकारणे एक कला असे. ती सर्वांजवळ नसे. घर म्हणा , गुरांचा गोठा म्हणा किंवा अन्य झोपडी म्हणा , पेंढ्यानी शिवण्यापूर्वीच त्याच्या चारही बाजूंना पेंध्यांच्या गुंड्या आधी आणून ठेवल्या जात. मग एकदा का घरशिव्या मिळाला , कि तो घराच्या छपरावर चढून एकेक पाखा ( बाजू ) शिवायला घेई. पाख्यावर पिवळ्या रंगाच्या गुंड्या ओळीने तो रचत गेला की छपराच्या सांगाड्यावर सोने अंथरल्यासारखे होई. अशात खालून-वर एक-दोन-तीन-चार पाखी शिवली गेली, की शेवटी घरशिव्या अक्कलहुशारीने गुंड्या लावून घर शिवण पूर्ण करी. त्या वेळी घराचा उस्तारला काळा सांगाडा लपून घर देवळासारखे सोन्याच्या कळसने शोभून दिसे. ते शाकारले घर भागून कुणबी मनात हरखे. अशात घरशिव्या वरून बोले , " द्या रं पागा. " म्हणजे शिवले छप्पर वार्याने उडू नये म्हणून त्याला दोरांनी बांधण्यासाठी दोर ( पागा ) लागत. त्या पागा म्हणजे अर्थातच भाताच्या पेंध्यांपासून वळलेले लांब बरखाडे ( दोर ) असत. त्यांनी शाकारले घर पूर्णपणे ओंबून घेत. ही पागांची ओम्बनी झाली की घरशिव्या घराच्या कळसावर उभा राहून हाकाटी करी , " हात रं .. , कांदोर कांदोरचा - " मग घरातून रुमालाची गठली येई. त्या गठ्लीत पिळलेले आंबे , सुक्या खोबर्याचे तुकडे , पांढरे कांदे , गुळाचे छोटे खडे आणि बरोबर मुठभर तांदूळ , अबीर गुलाल असे. पेटती उदबत्ती शाकारल्या घराच्या दरवाजाजवळच्या भिंतीत खोवून घरातून आलेली गठली सरळ घराच्या कळसावर मारुतीरायासारखे उभे असलेल्या घरशिव्याच्या हातात फेकली जाई , आणि मग तो ती गठली सोडून तिच्यातील अबीर-गुलाल घराच्या चौबाजूंना उधळून , तांदूळ वाहून , येत्या पर्जन्यादेवतेला आणि गणघोडा तो उंदीर त्याला मनोभावे करून 'कांदोर-कांदोर' असे जोराने ओरडे. तो 'कांदोर-कांदोर' ऐकून गावाच्या आळीतील , बिदितील पोरे 'अरं चला कांदोर-कांदोर' म्हणत , धावत शाकारल्या घराजवळ यायचे. आणि घरावरून फेकलेले ते गथालीतले आंबे , कांदे , खोबरे झेलायला चौबाजूना धावाधाव करायची आणि हाती गवसेल ते मताकावयाची. अशा कांदोर कांदोरी त्यावेळी गावभर घर शिवलेल्या ठिकाणी चालायच्या. याच वेळी घरमालक बाजूच्या आंबाच्या तहाला , बोराच्या झाडाचा तहाला आणून शिवल्या सोन्याच्या घराच्या छपराला खोवी.
हे 'कांदोर-कांदोर' म्हणजे उंदराला सन्तुस्त करण्यासाठी एक विधीच असे. उंदराने शाकारल्या घराचा पेंढा खाऊ नये आणि जर पेंढा खाल्ला तर घर गळेल ,ह्या भावनेने केलेली ती उंदीर आळवणी-पूजा असे. बरोबरच , शिवलेले घर वाऱ्याने-पावसाने उडवू नये ह्यासाठीही केलेली ही आळवणी-विनंती असे. आयु , पर्जन्य ह्या पंचाम्हाभूतांचे पूजन असे. शेतकरी मन सश्रद्ध , येणार वर्ष भरभराटीचे जावे , पीकपाणी योग्य यावे ह्याबरोबरच घराचे रक्षण व्हावे यातून ह्या सार्या विधी , पूजा येतात. घर शाकार्णीनंतर कांदोर-कांदोर हा असाच एक विधी. कृशिसंस्कृतीतील पूजाविधी.
वैशाख सरता सरता पूर्वी कोकणामध्ये गावांतील बहुतेक घरे शाकारून झालेली असायची. घरातील वर्षभराची जळमटे जाऊन घर आतून-बाहेरून स्वसचा व काल्साने सोन्यासारखे झालेले असायचे. घर शाकारताना सारा पेंढा एक्जीवपणे लावलेला असायचा. यातून घराचे छपर म्हणजे पिवळेधमक असे सोन्याचे मढवलेले वाटायचे. आजूबाजूला हिरवी झाडे , त्यात कुठेसा पिवळा बहावा फुलारलेला तर कुठेसा गुलमोहर पेटलेला आणि गावभर ही सोन्याची घरे. यातून ही जणू हिरव्यातून पिवळी पडलेली परशुरामाची सुवर्णभूमी वाटायची. या घरशाकारानीतून सहजीवन साकारायचे. घर शिवणारा माणूस त्यावेळी घरमालकाकडून मजुरी मागत नसायचा. पण घरमालक त्याला त्या मोबदल्यात चार आठ आणे आणि चहापाणी म्हणून पावशेर दारूसाठी द्यायचा. बरोबर अधीतील पिकले आंबे द्यायचा. मोठी घर्शिवणी असेल किंवा दोनतीन घरे शिवली गेली असतील तर घरवाला घर शिवणाऱ्याच्या एकदिवस कामाला जाई. बलुतेदारी पद्धतीतील ही एक जणू बिना पैसा मोबदल्याची मदत असायची. अशा घरात फारसा उकाडा होत नसे. नसे घुसत थंडी न पाऊस, पेंढा उष्णतेचे मंदवाहक. उन्हाळी अशी घरे उपयुक्त ठरत.
आज अशी सोन्याची घरे केव्हाच गेलीत. कोकणातील बहुतेक घरे कौलारू , काही सिमेंट स्लबची , तर काही सिमेंट पत्रांची झालीत. ती घरे शाकारणे एकदाच होते. तिथे कांदोर कांदोर नसते. आळीतील पोरे जमणे नसते. पंचमहाभूतांची पूजा नसते. दरवर्षी घर शाकारणी नाही म्हणजे घरझाडणी नाही. घरात , माळ्यावर वर्षभराची जळमटे तशीच! कोकणी गावे आता बदलली. गावात पेंध्याची घरे दिसतच नाहीत. मग ती पावसाळ्यापूर्वी सोन्याची कशी होणार ?
ही सोन्याची घरे पावसाच्या पाण्याने भिजली की एक भिजकट वास सुटायचा.श्रावणात ह्या सोनेरी घरांवर दुधी-डांगरीचे वेल धावायचे. मग ही सोन्याची घरे हिरवी वयाची नि दुधीची पांढरी आणि डांगरीची केशरी फुले फुलल्यावर अशी तीनरंगी घरे मनभर आनंद द्यायची. गावांतील हे दुधी - डांगरीचे मंडप बघून श्रावण-भादवा खूपखूप समाधान द्यायचा. सोन्याच्या घरांवरून मग दुधी -डांगरीची फळे मिळायची. ही फळे घरात भाजीला , बाजारात विकायला व्हायची. त्या वेळी दुधी-डांगरी ( भोपळा ) साठी वेगळा मांडव करायची गरज पडायची नाही. घर हाच मांडव असायचा , शोभिवंत.
आजच्या जागतिकीकरणात ही सोन्याची घरे हरवलीच !मात्र कोकणात ही सोन्याची घरे , जुने कोकण पाहायचे असेल तर , रत्नागिरी-गणपतीपुल्याजवळ निवेंडी नावाचे एक ठिकाण आहे. तिथे 'प्राचीन कोकण' म्हणून जुने गाव , लोक , बलुतेदार , अशी सारी वस्ती वसवली आहे. त्यास जरूर भेट द्या. मग भेटतील आपणास कोकणातील सोन्याची घरे , ते खोत , बलुतेदार , ती झाडे-पाने , मासे , आणि पक्षीही , अगदी पाचशे वर्षापूर्वीचे कोकणी गाव , कोकणसंस्कृती आणि घरसंस्कृतीही.
प्रा. शंकर सखाराम
( विवेक - घरकुल विशेषांक )
Comments
Post a Comment