मुर्दाड लोकांचा देश ...

मुर्दाड लोकांचा देश ..

भारतीय सेना जॉईन करणे म्हणजे काय पोरखेळ नाही. भारतीय सेना काय किंवा कोणतही भारतीय सुरक्षा दल जॉईन करायला काही विशिष्ट गुणांची गरज असते. शारीरिक आणि मानसिक फिटनेस हवा. बुद्धी देखील तल्लख हवी. एक जिगर लागते जे तो सैनिक आईच्या उदरातून घेऊन जन्म घेतो. मन वाघाचे हवे, नजर गरुडाची आणि ताकद हत्तीची. आर्मी ट्रेनिंग स्कुल्स म्हणजे कहर असतो. सकाळी पाचच्या आधी सुरु होणारा दिवस संपता संपत नाही. हिऱ्याला घडवतांना होणार त्रास फक्त हिराच जाणतो म्हणतात पण इथे हे हिरे घडवतांना किती लोकांना त्रास होत असेल.

रोज त्या ड्रील्स, ट्रेनिंग सेशन्स, युद्धनीतीचा अभ्यास करता करता त्या अठरा वीस वर्षाच्या पोरांचा जीव मेटाकुटीला येत असेल. आर्मी स्कुल जॉईन करायच्या आधी ज्या लेकराला साधं खरचटल तरी डोळ्यात गंगा यमुना उभ्या राहणाऱ्या त्याच्या माउलीची काय अवस्था होत असेल ट्रेनिंगची वर्णने ऐकून. आपल्या पोराचा हात गर्दीत कधीही न सोडणारा बाप आपल्या काळजाच्या तुकड्याला सैन्यात धाडतो तेच मुळात काळजावर दगड ठेवून.

आपल्याकडे पडणाऱ्या मंद थंडीत लेकरांच्या अंगावर गोधडी घालणारी माउली तीच लेकरू सियाचीनला उभे राहिल कस याचा विचार करत असेल की नाही ? शाळेत जातांना पावसाळ्याच्या दिवसात टाचा खराब होऊ नाही म्हणून गमबूट घेऊन देणारा बाप आपला मुलगा आसामच्या जंगलात कसा उभा आहे याचा विचार करत असेल की नाही ? तिकिटाला वाट्टेल ते पैसे देऊन राखी किंवा भाऊबीजेला आपण जातो, अगदी वाट्टेल तसे, पण कित्येक राख्या आणि भाऊबीज अनेक भगिनींनी वाट बघण्यात घालावल्या असतील. भावावर जीव ओवाळणाऱ्या या भगिनी कसे दिवस काढत असतील ?

तारुण्याचा कैफ सगळ्यांनाच असतो, आर्मीमेनला पण असणार. अश्याच एका सैनिकाशी लग्न करून त्याची वाट बघणारी त्याची बायको काय विचार करत असेल? तासभर फोन स्विच ऑफ होता म्हणून आपली बायको आपल्यावर भडकते पण सेक्युरिटी कारणासतो जेव्हा आपला नवरा कुठे पोस्ट आहे हे तिला माहीत नसेल तर तिची काय अवस्था होत असेल. बाबा बिझनेस टूर वर जातांना रडणारी पोर मी बघितली आहेत. आपला बाबा परतेल कि नाही याची शाश्वती नाही हे माहीत असलेली मुले किती लहान वयात मैच्युअर होत असतील? मित्रांचा ग्रुप असतो, ते धांगडधिंगा करतात, पार्ट्या करतात आणि एक दिवस त्यांचाच एक मित्र हुतात्मा झाल्याची बातमी येते, हे मित्र परत कधी अशी पार्टी अश्रू न ढाळता करू शकत असतील का ?

मला मान्य आहे , आर्मी जॉईन करतांना या सगळ्या गोष्टींचा/धोक्यांचा विचार तो मुलगा आणि त्याचा परिवार करत असेल. पण शहादत मिळावी ती शत्रूशी दोन हात करतांना, अश्या भ्याड हल्यात नाही. दोन हात करण्याची संधी न मिळता तर अजिबात नाही. आपण पोर तयार करतो ते यासाठी नक्कीच नाही, माऊली आपली लेकरं यासाठी पाठवत नाही. अश्या भ्याड हल्यांना आपल्याकडून सडेतोड उत्तर हे गेलेच पाहिजे. लोकांना लेकरं जास्त झाली आणि म्हणून आर्मीत पाठवली आहेत असं तर नाही आहे न.

आजची रात्र मला झोप येणार नाही. त्या जवानांच्या फॅमिली माझ्या डोळ्यासमोर उभ्या राहतील. यासाठीच का पाठवली होती आम्ही आमची माणसे हा प्रश्न घेऊन.  एक माणूस आर्मी जॉईन करत नसतो, त्याचा संपूर्ण परिवार जॉईन करतो. माणूस जन्माला आला म्हणजे मरणारच आणि हेच अंतिम सत्य आहे. पण हा मानवाचा जन्म आहे, त्याची कदर हि व्हायलाच हवी. तिरंग्यात लपेटलेल्या त्या शवपेटीका उद्या परवा येतील आणि आपल्याला अनेक प्रश्न विचारतील. जर सरहद्दीवर उभे राहणे हे त्यांचे कर्तव्य होते तर त्यांना आणि त्यांच्या परिवाराला पडलेल्या सगळ्या प्रश्नांची योग्य उत्तरे देणे हे आपले कर्तव्य नाही का ?

अतिरेक्याला फाशी देऊ नका अश्या याचिकेसाठी रात्री दोनला उघडणार कोर्ट या हुतात्म्यांसाठी काही करेल का ? पॅलेट गन वापरू देऊ नका म्हणून PIL दाखल करणारे पुरोगामी आज चिडीचूप होऊन कोणत्या खोपच्यात जाऊन बसले आहे? ह्युमन राईट्सवाले आज जिवंत आहेत की गेले यमसदनी कि भेटले त्यांना मिठाईचे बॉक्स ?

प्रश्न अनेक आहेत आणि आपले रक्त उसळ्या मारत नाही ही वस्तुस्थिती आहे. ज्या देशात सैनिकांच्या हौतात्म्यावर लोकांच्या डोळ्यात पाणी येत नाही तिथे मुर्दाड लोकच राहतात कारण त्यांच्या भावना बोथट झालेल्या असतात.

जय हिंद - राष्ट्र प्रथम.. या देशाचा एक नागरिक.

Comments