अ स्मॉल टाऊन गर्ल
नवशक्ती दैनिकातील दिवाळी विशेष मधील माझा लेख
------------------------------
अ स्मॉल टाऊन गर्ल
मी नम्रता.. नम्रता वागळे, अँकर, एबीपी माझा.... एका आघाडीच्या टीव्ही वाहिनीवर मला पाहिलं जातं.. माझा चेहरा माझं काम याचं कौतुक होतं.. कधी टीकाही होते.. अनेकदा राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या तरुण मुलामुलींकडून मला विचारणा होते... 'आम्हाला तुमच्यासारखं बनायचंय पण आम्ही खेडेगावातले आहोत... तुमच्यासारखे बनण्यासाठी काय करायला हवं ते सांगा '... यातील बहुसंख्य मेसेज आणि कॉल हे महाराष्ट्रातल्या दुर्गम भागातून असतात... अशाच काही हरहुन्नरी मुलांसाठी आज मी गोष्ट सांगणार आहे ... माझी.. गोष्ट नम्रता वागळेची...
आजपासून दहा वर्षांपूर्वी नम्रता वागळे या नावाला एका ठराविक वर्गाशिवाय कोणीही ओळखत नव्हतं. आणि त्यापूर्वी दहा वर्ष हे नाव मुंबई पुणे यासारख्या शहरांच्या खिजगणतीतही नव्हतं. हे नाव कोकणातल्या एका छोट्याश्या गावातल्या छोट्याश्या शाळेत घेतलं जायचं.. वर्गात प्रथम येणारी विद्यार्थिनी म्हणून... माझे आई-बाबा- श्यामल आणि सुभाष वागळे ... दोघेही शिक्षक... आणि आमचं कुटुंब रहातं रत्नागिरी जिल्ह्यातल्या मंडणगड या तालुक्यात... या तालुक्यातील घराडी हे अगदी डोंगराच्या कुशीत लपलेलं माझं छोटंसं गाव.... लोकवस्ती हजारभर असेल.. गावात शाळाही फक्त सातवीपर्यंतच होती... अर्थात मुलांच्या शिक्षणासाठी आई-बाबांनी बिऱ्हाड तालुक्याला हलवलं.. आणि बऱ्याच अडीअडचणींवर मात करत मंडणगड इथे माझं दहावीपर्यंतचं शिक्षण झालं... आणि प्रश्न आला पुढे काय... माझी आई स्वतः शिक्षिका, घरातली कमावती स्त्री आणि नोकरी सांभाळून घरची जबाबदारी अत्यंत समर्थपणे पेलणारी ... अर्थात मुलीनं उच्च शिक्षण घेउन स्वतःच्या पायावर उभं राहीलं पाहिजे ही आई आणि बाबा दोघांचीही इच्छा होती.. नवं सह्स्रक नुकतंच सुरू झालेला हा काळ.... त्याकाळी शहरात वेगवेगळ्या करीअर ऑप्शन्स उपलब्ध होत्या पण ग्रामीण भागापर्यंत त्याविषयी प्रबोधन झालेलंच नव्हतं... ग्रामीण भागात एकच ट्रेंड.. हुशार मुलांनी विज्ञान शाखेत प्रवेश घ्यावा... मराठी माध्यमातलं इंग्रजी पणाला लावून बारावीत चांगले गुण मिळाले तर मेडीकल आणि इंजिनिरिंग पैकी एखादा पर्याय निवडावा... ग्रामीण भागाची मजल एवढीच होती... कायम उत्सुकतेन भरलेला माझा मेंदू मला या ढोबळ वाटेवर चालायची परवानगी देत नव्हता परंतू कुठेतरी सुरवात हवी म्हणून सायन्सला अॅडमिशन घ्यायचं ठऱलं आणि माझी रवानगी झाली पुण्याला,
. आयुष्यात पुणं पहिल्यांदा पाहिलं होतं.. त्यातही कोणीतरी डोक्यात भरवून दिलेलं की फर्ग्युसन महाविद्यालयात खूप फॉरवर्ड विद्यार्थी असतात तिथे तुझा निभाव लागायचा नाही.. तू एसपीला जा..अर्थात हा गैरसमज पुण्यात गेल्यावर महिन्याभरातच पुसला गेला...पुण्याच्या सर परशुरामभाउ (एसपी) महाविद्यालयात सायन्सला माझा दाखला झाला.. आणि महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये माझी रवानगी करत आई-बाबा निघून गेले .... आपण पुण्याच्या एका मोठ्या कॉलेजात आलोय या भावनेची फुलपाखरं मनात उडायला लागली... कॉलेजचा पहिला दिवस आयुष्यात कधीही न विरता येणारा असतो... माझाही होता... गावातल्या शाळेतली टॉपर.. तिथे वर्गावर राज्य करायची सवय .... खेडेगावात सर्वात सुंदर दिसणारे कपडे माझ्याकडे... मोठ्या अभिमानानं ठेवणीतला एक पंजाबी ड्रेस काढून नेसला... गावात प्रतिदिन ज्याचं कौतुक व्हायचं त्या लांब केसांची तेल लावून वेणी घातली... खास पुण्याला येण्यासाठी गावच्या दुकानातून घेतलेली महागडी फुलांची प्रिंट असलेली स्लिपर घातली आणि तोऱ्यात कॉलेजसाठी निघाले... हॉस्टेल कॉलेजच्या आवारातच होतं... हॉस्टेलच्या बाहेर जसा पाय पडला... माझा तोरा धाडकन जमिनीवर आदळला... हजारोंच्या संख्येनं आलेली विद्यार्थ्यांची गर्दी... त्यांचे शहरी ढंगाचे कपडे, त्या कपड्यांवर मारलेल्या पर्फ्यूमचा सुगंध..... जीन्स आणि हाय हिल्स घालत तोऱ्यात चालणाऱ्या मुली.. या साऱ्यात मी स्वतःलाच दिसायची बंद झाले.. त्या गर्दीतही मी अदृष्य असल्यासारखीच होते.. कोणीही ढुंकूनही पाहत नव्हतं... नाक्यावरच्या काही टपोरी पोरांनी ' ए हे बघ नवं अँटीक पीस आलंय'. अशी इगो दुखवणारी कमेट पास केली... तरीही हिम्मत करून वर्ग शोधला आणि पहिल्या बेंचवर जावून बसले.. पण माझा अवतार बघून माझ्या वर्गातलं एकही जण माझ्यासोबत बेंचवर बसायला आलं नाही.. थोड्या वेळानं हॉस्टेलमधलीच माझ्यासारखी एक साधी मुलगी येवून माझ्यासोबत बसली... आधीच माझ्या अवतारावरून मिळालेल्या सापत्न वागणुवरून माझा हार्ट ब्रेक झालाच होता त्यात बॉटनीचा पहिला तास झबरदस्त इंग्रजीच्या उड्या मारत डोक्यावरून पसार झाला आणि मला रडूच आवरेना... हुंदका आणि अश्रू महत्प्रयासानं आवरत पहिला दिवस कसाबसा संपवला आणि होस्टेलला आले... करीअर, मोठी स्वप्न हे सगळं दूरच आपल्याला कॉलेज झेपेल का हाच प्रश्न उभा राहीला...आणि मनात विचार आला आपण घरी परत जायचं का...
आयुष्यात जेव्हा कधी अशी द्विधा मनस्थिती होते तेव्हा काय करू नये याचं एकच उत्तर आहे- घाई..... कुठेतरी वाचलं होतं.. आता वेळ होती अमलात आणायची... पहिल्या दिवशीचा अनुभव मनाच्या कवाडात बंद करून झोपले उद्याचं उद्या बघू हा विचार करत... आणि सकाळी एक नवा विचार घेवूनच उठले... दुनिया स्वीकारेल अथवा नाही हे पाहून घेउ पण मी मात्र स्वतःला जशी आहे तसंच स्वीकारलं...आई-बाबांनी आर्थिक चणचणीत आपल्याला शहरात शिकायला पाठवलंय त्याचं चीज करायचं हे मनाशी पक्कं बांधलं आणि आता बॅकफूट बास झालं फ्रंटफूटवर खेळायचं ठरवलं.. हळूहळू परिस्थिती शिकवतेच.. मीही शिकले.. अकरावी जेमतेम फर्स्ट क्लासपर्यंत पोचली आणि मला लक्षात आलं की बारावी सोपी नक्कीच नाही... माझ्यासारखे अनेकजण शहरात येतात आपण बरे आणि आपला अभ्यास बरा असं म्हणत चांगले गुण मिळवतात चांगलं करीअर करतात... पण माझा उत्सुकतेनं भरलेला मेंदू मला अभ्यासाबरोबर शहर शिकायलाही भाग पाडत होता.. कारण मला गावाशी नाळ कायम ठेवून शहरात मिसळायचं होतं.. चमकणाऱ्या शहरी पोरांच्यात मिठाच्या खड्यासारखं टाकाउ रहायचं नव्हतं... नव्या गोष्टी शिकत बघत जमेल तसा अभ्यास करत बारावी झाली... तिथेही कसाबसा फर्स्ट क्लास मिळवला आणि बीएस्सी ला अॅडमिशन घेतली.. कारण ढोबळ मार्गावर चालायचं नाही हे घऱ सोडतानाच ठरलेलं होतं.. बीएस्सी करताना आपल्याला पुढे काय करायचंय याचं उत्तर मिळवण्यासाठी वेळ मिळेल अशी आशा होती... आणि सिनीयर कॉलेज सुरू झालं...
सिनीयर कॉलेजच्या पहिल्याच दिवसापासून मी माझं ट्रान्सफॉर्मेशन सुरू केलं होतं.. पंजाबी ड्रेसऐवजी जीन्स कुडता, टी शर्ट असे शहरी टच असलेले पोषाख आले... लहानपणापासून सैन्यदलांविषयी आवड असल्यानं एनसीसी जॉईन केलं... बाबांनी सांगितलं होतं एमपीएससी चा पर्याय आहे त्याचाही विचार कर ... त्याचाही क्लास लावून पाहिला.. थोडक्यात दिवसभर काहीतरी करण्यात स्वतःला बिझी केलं.. . माझ्यात इन्फीरीटी कॉम्प्लेक्स येण्यामागचं आणखी एक कारण होतं ते म्हणजे हातात असलेला मोजका पैसा.. आई-बाबा माझ्या मुख्य गरजांना पुरेल एवढा पैसा नक्की देत होते.. पण छानछोकी करायला हातात पैसा फार उरत नव्हता... आयुष्यात थेटरात पहिला सिनेमा मी अकरावीत असताना पाहिला होता.. आणि बारावीत दुसरा... सिनीयर कॉलेजला मला सुदैवानं खूप चांगला ग्रूप सापडला.. मी जशी आहे तसं मला स्वीकारणा.. माझ्यातला आत्मविश्वास दुणावत गेला... अभ्यासातही तो दिसायला लागला...... थोडक्यात दोन वर्षात माझ्यावर चढलेला अविश्वासाचा गंज उतरवत मी स्वतःला पॉलिश करायला सुरवात केली... ग्रॅज्युएशनच्या आसपास ठरवलं आपण डिफेन्स क्षेत्रात करीअर करायचं आणि काहीतरी बॅक अप प्लॅन पाहिजे म्हणून वर्पतमान पत्रात आलेल्या जाहीरातीत वाजून पत्रकारीता हा दुसरा पर्याय ठेवला... . दुर्दैवानं शेवटच्या वर्षाला निकालात एक पेपर विद्यापीठाच्या चुकीनं राहीला रीव्हॅल्युएशन मध्ये सुटला पण तोवर वर्ष वाया गेलेलं सगळीकडची अॅडमिशन्स फुल्ल झालेली.. मग वर्ष वाया जाणार नाही यासाठी मार्गक्रमण सुऱू झालं...
गॅज्युएट होता होता... पेपरमध्ये एअर फोर्सची जाहीरात आली.. पायलट पदासाठी अर्ज केला आणि पुण्यात एसएसबी इन्टर्व्यूचं प्रशिक्षण सुरू केलं.. दुर्दैवानं डोळ्याचा नंबर आणि अॅप्टीट्यूड टेस्टमधले कमी गुण यामुळे सिलेक्शन झालं नाही.. पण वर्ष वाया घालवण्यापेक्षा आर्मीसाठी प्रयत्न करून बघू असं ठरलं.. आणि एसएसबी चं प्रशिक्षण सुरू ठेवलं.... पण आपण काहीच न करताना आई बाबाना आपल्यावर हजारो रुपये खर्च करावे लागत असल्याची अपराधी भावना होती.. त्यामुळे कॉलसेंटरची नोकरी सुरू झाली... नाईट शिफ्ट नोकरी आणि दिवसा अ्भ्यास.. तोवर पुढील शैक्षणिक वर्ष आलं पत्रकारीतेची एन्ट्रन्स दिली आणि पुण्याच्या रानडे इन्स्टीट्यूटमध्ये पत्रकारीची पदविका सुरू झाली... रात्री नोकरी दिवसा कॉलेज आणि अभ्यास...मी गणितात पदवीधर असल्यानं काही सॉफ्टवेअर कंपन्यांच्या ऑफर्सही आल्या पण मी घरच्यांच्या विरोधाला न जुमानता त्याला केराची टोपली दाखविली... पत्रकारीतेचा अभ्यासक्रम सुरू असताना सकाळ पेपरमध्ये नवोदितांची भरती सुरू झाली त्यात माझी निवड झाली.. मी कॉलसेंटरची नोकरी सोडली आणि पत्रकारीतेची कास धरली.. आणि 14 फेब्रुवारी 2008 माझं पत्रकारीतेत करीअर सुरू झालं... पत्रकारीतेतला माझा पहिला पगार कॉल सेंटरच्या पगाराच्या एक तृतियांश इतका होता... अनेक जवळच्यांनी 'भीकेचे डोहाळे' अशा शब्दात माझी अवहेलनाही केली... पण मी ठाम होते... मी स्वतः निवडलेलं हे क्षेत्र होतं.. त्यामुळे सगळ्या अडचणींवर पाय देत मला उभं रहायचंच होतं...
.गावाशी नाळ जोडलेली शहरी नम्रता पत्रकार झाली ..... पत्रकारीतेतल्या अनुभवासोबत पगाराचेही बरे आकडे दिसायला लागले.. माझ्या साडेनउ वर्षांच्या करीअर मध्ये मी सहा वर्ष सकाळ माध्यम समूहाच्य साम मराठी या वाहिनीसाठी बातमीदारी केली.. लोकसभा, विधानसभा, महापलिका, ग्रामपंचयची यांच्या निवडणूका.. क्राईम सीन .... राजकीय आखाडे, खेळाची मैदानं ... फॅशन रॅम्प.. बॉम्बस्फोट .. समाज.. हे सारं काही या सहा वर्षांच्या काळात फील्डवर अनुभवलं.. .. आणि डिसेंबर 2013 पासून वेगळा मार्ग निवडला ... फील्डमधून स्टुडिओकडे आले.. सध्या एबीपी माझा मध्ये मी अँकरींग करत आहे... आता पत्रकारीतेतले अनुभव सांगायला सुरवात केली तर गोष्ट आणखी खूप मोठी होईल... त्यामुळे ते अनुभव सवडीनं कधी मांडेन....
माझ्या या प्रवासात एक गोष्ट मला खूप फायद्याची होती ती म्हणजे शहरी नम्रताच्या मागे लपलेली गावातली साधी, धडपडणारी, लढणारी, पण तरीही संवेदनशील नम्रता... शहरी भागातलं आयुष्य आणि ग्रामीण भागातलं आयुष्य यात जमीन आस्मानाचा फरक असतो... शहराच्या तुलनेत गावाकडच्या गरजा कमी असतात.. गावचा माणूस अडचणींना स्वतः भिडतो त्या अडचणींना बायपास करत नाही.. गावाकडच्या मुलांना शहरात टिकण्यासाठी ही सर्वात फायद्याची गोष्ट असते... मी गावाकडची होते म्हणून शहरात मला संघर्ष करावा लागला का ... तर नाही...मला अवघड आणि संघर्षपूर्ण रस्त्यावरच चालायचं होतं.. तुम्ही कायम अवघड रस्ताच निवडावा असं नाही... तुम्हाला चॉईस असतो .... तुमचा प्राधान्यक्रम ठरवा... आय मेड माय चॉईस... मी गाव शिकून आले होते आता मला शहर शिकून घ्यायचं होतं.. आणि हा नव्या गोष्टी जाणून घेण्याचा आणि कायम नवं काहीतरी शिकत रहायचा स्वभाव मला पत्रकारीतेत खूप उपयोगी आला... विशेषतः बातमीदारी करताना रस्त्यावरच्या सफाई कामगारापासून देशाच्या राष्ट्रपतींपर्यंत कोणाशीही संबंध येवू शकतो.. त्यावेळी तुमच्यातला गावाकडचा मातीतला माणूस या सगळ्याकडे खूप संवेदनशीलपणे पाहू शकतो... कोणत्याही परिस्थिती स्वतःला चपखल बसवू शकतो.. तुम्ही गावाकडचे आहात म्हणून तुम्ही कमी नसता.. किंवा तुम्ही गावंढळ नसता.. शहरी विद्यार्थ्यांपेक्षा तुम्ही मठ्ठ नसता... असा कोणी शिक्का तुमच्यावर मारत असेल तर त्याकडे फक्त दुर्लक्ष करा... आणि तुमची वाट निवडा... गावाकडील असणं हा सेटबॅक नाही उलट हा तुमच्या रेझ्युमे मधील एक जास्तीचा गुण आहे.... अनुभवावरून सांगतेय कारण आय अॅम अ स्मॉल टाऊन गर्ल...!
Comments
Post a Comment