_*'सोनू'चा जन्मदाता कोण?*_
_*'सोनू'चा जन्मदाता कोण?*_
‘सोनू तुला माझ्यावर भरवसा नाय काय…’ हे गाणं कोणाला माहिती नाही? या गाण्याने अक्षरशः जगभर धुमाकूळ घातला आहे. संपूर्ण भारतभर या गाण्याची क्रेझ पाहायला मिळाली आहे. लहानग्यापासून मोठ्यापर्यंत प्रत्येकाच्या तोंडी हे गाणं विराजमान आहे. इतकाच काय तर महाराष्ट्राच्या विधानसभेत देखील ‘सोनू तुला माझ्यावर भरवसा नाय काय’ हा प्रश्न गाण्यातून विचारला गेला. याच गाण्याच्या चालीवरून Rj Manishka ने मुंबईतील खड्डयांचा प्रश्न चव्हाट्यावर आणला होता त्यावरून मोठं राजकारण तापलं. पण तुम्हाला माहिती आहे का या गाण्याचा जन्मदाता कोण आहे? नाही ना! हे गाणं लिहिलं आहे सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी गावातील अजय क्षीरसागर यांनी.
‘सोनू तुला माझ्यावर भरवसा नाय काय…’ या गाण्याचा इतिहास मोठा असून हे गाणं खुप वर्षांपासून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात वेगवेगळ्या स्वरुपात गायलं जातं आहे. मात्र सध्या जे गाणं लोकप्रिय झालंय, ते सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी गावातील अजय क्षीरसागर आणि त्यांची पत्नी भाग्यशाली क्षीरसागर यांनी जानेवारी महिन्यात बनवलं आहे. कुर्डूवाडीतील अण्णाभाऊ साठे नगरातील छोट्याशा घरात हा कलाकार राहतो. आपल्या भावाला काहीतरी वेगळे गाणे देण्यासाठी अजय क्षीरसागर हे प्रयत्नात होते आणि त्याचवेळी त्यांच्या पत्नी लाडाने ‘सोनू बाजारात चला’ असे अजयला म्हणाल्या आणि इथूनच सुरु झाला 'सोनू'चा प्रवास...
आळंदीमध्ये त्यांनी हे गाणं रेकॉर्ड केलं आणि भावाला पाठवलं. त्यांचा भाऊ अविनाश अवघडेने हे गाणे सोशल मीडियावर पोस्ट केलं आणि तिथूनच धुमाकूळ सुरु झाला. त्याच गाण्यावर अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर येऊ लागले. या गाण्याची लोकप्रियता एवढ्या मोठ्या प्रमाणात होती की, ती फक्त मराठी किंवा महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिली नाही. हिंदी आणि इतर भाषांमध्येही हे गाणं त्या त्या भाषेतील शब्दांसह तयार करण्यात आलं. यानंतर त्यांना त्यांच्या गाण्याची जादू कळली.
_*कोण आहेत अजय क्षीरसागर*_
अजय क्षीरसागर हे कुर्डूवाडी शहरातील अण्णाभाऊ साठे झोपडपट्टीमध्ये राहतात. आजोबा नामदेव भिसे यांच्यासोबत त्यांनी लोकगीतांचा सराव सूर केला. अजय यांचे आजोबा एकतारीवर सुरेख भजने म्हणायचे. त्यांच्याच तालमीत अजयचा गळा तयार झाला.यानंतर अजय यांनी देवीची गाणी लिहून म्हणायला सुरुवात केली. यानंतर ते विविध कार्यक्रमातून लोकगीते सादर करू लागले. ते व्यावसायिक कार्यक्रमही करतात सोबत लिखाणही चालू आहे.
Comments
Post a Comment