सावंतवाडी(कुणकेरी)आगळा वेगळा हुडा उत्सव

सावंतवाडी(कुणकेरी)आगळा वेगळा हुडा उत्सव

कोकणात धार्मिक कार्यक्रमात शिमगोत्सव काळात आगळा वेगळा अनुभव येतो. प्रत्येक गावात विविध रीतीरिवाजाप्रमाणे शिमगोत्सव साजरा होतो. तसाच कुणकेरी येथील श्री देवी भावईचा हुडा उत्सव सर्वदूर प्रसिद्ध आहे. शिमगोत्सवाच्या सातव्या दिनी हा उत्सव होतो. त्यामुळे हजारो लोक खास उपस्थिती दर्शवितात.
कुणकेरी येथील श्री देवी भावईचा हुडा उत्सव १८ मार्च रोजी होत आहे. सागवानी लाकडाची शंभर फुटी उंच होळी उभारली जाते. तिला सजविले जाते, त्यावर अवसारी देव चढण्यासाठी विशिष्ट प्रकारची सोय असते. त्याला हुडा संबोधले जाते.
शिमगोत्सव काळाच्या सातव्या दिवशी हुडा उत्सव असतो. शिवाय घोडे मोडणी, हुडा उत्सव सोबतच रोंबाट, कवळे जाळणे अशा विविध कार्यक्रमांनी शिमगोत्सव साजरा होतो. होळीच्या चौथ्या दिवशी चव्हाटय़ावर हळदीचा कार्यक्रम, पाचव्या दिवशी खेळगडय़ांचा कार्यक्रम व दांडय़ांचे रोंबाट घातले जाते.
शिमगोत्सवाच्या सहाव्या दिवशी प्रत्येक वाडय़ातील मानाप्रमाणे रोंबाट एकत्र येऊन गुलाल उधळतात. नंतर रोंबाट पुढे श्री देव क्षेत्रपालाचे दर्शन घेण्यासाठी अवसार काठीसह सीमेपर्यंत धावत जातात. श्रींचे दर्शन घेतल्यावर भवानीचे दर्शन घेऊन रोंबाट चव्हाटय़ावर येते. त्यानंतर सायंकाळी होळी व हुडय़ावर धूळ मारण्यासाठी एकत्रित येऊन धुळवड साजरी करतात. या काळात पेटत्या शेणी (पाळीव जनावराच्या शेणापासून बनविलेल्या) मारण्याचा कार्यक्रम होतो. शेणी जाळून झाल्यानंतर कवळे जाळली जातात. (झाडाच्या फांद्यापानासह एकत्रित बांधलेली सुकी मोळी) जाळताना पेटत्या आगीतून धावण्यास भाविक आघाडीवर असतात.
सहा दिवस शिमगोत्सव साजरा केल्यानंतर सातव्या दिवशी हुडा उत्सव साजरा केला जातो. श्री देवी भावईचे भाऊ आंबेगाव येथील श्री देव क्षेत्रपाल व कोलगावचा लहान भाऊ श्री देव कलेश्वर आपल्या बहिणीच्या या हुडा उत्सवात निशाणकाठी व मानकऱ्यासहित उपस्थित राहतात.
सायंकाळी देवस्थानचे मानकरी परब यांच्या निवासस्थानावरून श्री देवी भावईची पालखी निशाण काठीसह मंदिराकडे आणली जाते. तेथे विधीवत धार्मिक कार्यक्रमानंतर अवसारी प्रसाद कौलानंतर पालखी व रोंबाट हुडय़ाजवळ येते. तेथे घोडे मोडणी, वाघाची शिकार आदी परंपरेप्रमाणे होत असलेले कार्यक्रम केले जातात.
पालखी हुडय़ाजवळ ठेवून तीन संचारी अवसारी पुरुष शंभर फुटी गगनचुंबी हुडय़ावर चढतात. हे अवसारी पुरुष हुडय़ावर झराझरा चढत असताना भाविक त्यांच्या दिशेने खालून दगड फेकतात. हा दगड त्यांच्यावर बसत नाही, पण तो ज्याच्या हातून बसेल तो भक्त भाग्यवान ठरतो. अवसारी पुरुष शंभर फुटी हुडय़ावर झटपट चढत असताना त्याच्या दिशेने दगड वेगाने मारला जातो. ते पाहण्यासाठी हजारो डोळे गगनचुंबी हुडय़ाकडे टिपून राहतात. होळी सणातील या उत्सवात चाकरमानी मोठय़ा संख्येने उपस्थित असतात.
निखाऱ्यावर चालणे आणि वाघाच्या शिकारीचा थरार विज्ञान युगातही सुरूच.....
अवसारी संचारा (देव)वर दगडफेक करणे, कवळे जाळून त्यातून नाचणे आणि वाघाची शिकार करणे असे होळी उत्सवातील थरार विज्ञान युगातही सुरू आहेत. ते पाहण्यासाठी भाविकांची ओसंडून वाहणारी गर्दी श्रद्धेवर विश्वास ठेवणारी ठरत आहे. कुणकेरी येथील सात दिवसांच्या होळी उत्सवातील ही आगळीवेगळी प्रथा आजही सुरू आहे.
कुणकेरी गावात देवी भावईचा हुडा उत्सव सर्वत्र प्रसिद्ध आहे. या सणामुळे भाविकांची भेट म्हणण्यापेक्षा दोन देव बहिणीला (श्री देवी भावईला) भेटण्यास येतात, हाही एक अचंबित करून टाकणारा प्रकार डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरतो.
हुडा म्हणजे १०० फुटी सागवानी उंचच्या उंच होळी घातली जाते. तिला झाडाच्या पानांनी सजविली जाते. त्याला हुडा म्हणून संबोधिले जाते. सात दिवसांचा शिमगोत्सव या गावात थाटात साजरा केला जातो. या काळात विविध कार्यक्रम होतात.
भाऊ-बहिणीची भेट
कुणकेरी गावाजवळ असणाऱ्या आंबेगाव येथील श्री देव क्षेत्रपालेश्वर आणि कोलगाव येथील श्री देव कलेश्वर ही दोन देवस्थाने आहेत. कुणकेरीच्या देवी भावईच्या होळी सणातील हुडा उत्सवाला श्री देव क्षेत्रपालेश्वर, श्री देव कलेश्वर आणि श्री देवी भावईची भेट होते. श्री देवी भावईचे हे दोन भाव म्हणून ते हुडा उत्सवाला बहिणीच्या भेटीला येतात, अशी आख्यायिका आहे. बहिणीला तरंग काठीसह वाजतगाजत भेटण्यास येणाऱ्या भावांना आणण्यासाठी देवीची पालखीही नेली जाते. हा देखणा प्रसंग गावाच्या व तेथे राहणाऱ्या लोकांच्या श्रद्धेतून एकात्मता निर्माण करतो.
कवळे व शेणी जाळणे
शिमगोत्सव काळात रोंबाट, राधा नाचणे अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल असते. होळी सणात रोंबाटात नाचण्यासाठी खास मुंबईहून चाकरमानी गावाला येतात. त्यामुळे या सणात आनंदाची भर पडते. कुणकेरी गावात होळी सणाचा थाट औरच असतो. तो पाहण्यासाठी नातेवाईक व भाविक येतात.
झाडांच्या फांद्या एकत्रित करून मोळी बांधली जाते, त्याला कवळे म्हणतात. ही कवळे शेतात जाळल्यास किडीचा प्रादुर्भाव होत नाही, तो खताचा उत्तम उपाय ठरतो. खतांची मात्रा असणाऱ्या या कवळांना जाळण्याचा होळी उत्सवातील प्रकार आगळा-वेगळा ठरतो
.
घोडे मोडणी आणि वाघाची शिकार
रोंबाट, राधा नाचवणे, घोडे मोडणी व वाघाची शिकार किंवा अन्य प्राण्यांची सोंगे घेऊन शबय मागण्याचा प्रकार होळी उत्सवात घडतो. कुणकेरीत घोडे मोडणी हा प्रकारही आगळावेगळा ठरतो.
घोडय़ाच्या पायाखाली झोपणे आणि त्यावरून घोडा जाण्याने संबंधित व्यक्तीच्या आयुष्यातील दु:खे जातात, अशी आख्यायिका आहे. घोडे मोडणीमधील विविध प्रकार घडतात. कधी काळपासून सुरू असलेली ही प्रथा आजही होळी सणात प्राधान्याने सुरू आहे.
वाघाची शिकार करण्याच्या क्षणालाही फारच महत्त्व असते. वाघाला घेऊन शिकार करण्याचे उत्सवातील एक क्षणचित्र आज वाघ किंवा घोडय़ाचे सोंग घेऊन केले जात असले तरी पूर्वी कृती केली जायची. हे शेतकरी व शेती भोवतीचे चक्रव्यूहासारखे फिरणारे सणाचे चक्र थेट पर्यावरण व निसर्ग रक्षणाचे शिक्षण देते.
होळी उत्सवातील असेच क्षण कोकणातील प्रत्येक गावात वैशिष्टय़ ठेवून जाणारे आहेत.
प्रत्येक गावाचे रीतिरिवाज आगळावेगळा आनंद देणारे ठरतात. त्यामुळे कुणकेरी हा एकच गाव नव्हे, तर सिंधुदुर्गात होळी सणाचे पारंपरिकता राखणारी वैशिष्टय़े महत्त्वाची ठरतात.

Comments